किल्ले
विजयदुर्ग किल्ला : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोची जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळालेली आहे, त्यापैकी विजयदुर्ग किल्ला एक आहे. विजयदुर्ग किल्ला महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावर असलेला एक प्राचीन आणि ऐतिहासिक जलदुर्ग आहे. हा किल्ला शिलाहार वंशातील राजा भोज दुसऱ्यांच्या राजवटीत, सुमारे इ.स. 1193 ते 1205 दरम्यान बांधण्यात आला. सुरुवातीला याचे नाव “घेरिया” होते.
इ.स. 1653 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाकडून जिंकून त्याचे नाव “विजयदुर्ग” ठेवले. शिवाजी महाराजांनी किल्ल्याचे महत्त्व ओळखून त्याचा विस्तार केला. त्यांनी 3 मजबूत भिंती, 20 बुरुज आणि सागरी तटबंदी बांधली. यामुळे हा किल्ला “पूर्वेकडील जिब्राल्टर” म्हणून ओळखला जातो.
हा किल्ला सुमारे 17 एकर क्षेत्रफळात पसरलेला असून तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. पूर्वेकडे वाघोटन नदीचे मुख आहे. संरक्षणासाठी किल्ल्याभोवती एक खोल खंदक आहे. किल्ला सागरी लढाईसाठी महत्त्वाचा ठरला होता, कारण येथे मराठा जलसेनेचा एक महत्त्वाचा तळ होता.
समुद्रात 122 मीटर लांब आणि 3 मीटर उंच तटबंदी बांधली गेली आहे, जी शत्रूच्या नौकांना थोपवण्यास उपयोगी होती. किल्ल्यावर हनुमंत देवीचे मंदिर, सभागृह (खलबतखाना) आणि मजबूत बुरुज बांधलेले आहेत.
1698 मध्ये कान्होजी आंग्रे यांनी विजयदुर्गला आपली राजधानी बनवली. त्यांच्या नेतृत्वात किल्ल्याने इंग्रज, पोर्तुगीज आणि डच यांच्यासारख्या परकीय शक्तींशी यशस्वीपणे लढा दिला.
देवगड किल्ला : हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात, अरबी समुद्र आणि देवगड खाडीच्या संगमावर असलेल्या टेकडीवर वसलेला एक प्राचीन आणि ऐतिहासिक जलदुर्ग आहे. तीन बाजूंनी समुद्र आणि दक्षिणेकडून जमिनीशी जोडलेला हा किल्ला सुमारे 120 एकर क्षेत्रफळात पसरलेला आहे. किल्ल्याचे भव्य बुरुज, मजबूत तटबंदी, प्रवेशद्वाराजवळील गणपतीचे मंदिर, हनुमान मूर्ती, जुनी तोफा, चौकोनी विहिरी, झरोके आणि 15 मीटर उंचीचा प्रकाशस्तंभ हे त्याचे वैशिष्ट्य आहे. किल्ला दोन भागात विभागलेला असून एक बालेकिल्ला टेकडीवर तर दुसरा भाग समुद्रकिनाऱ्यालगत आहे. 1729 साली दत्ताजीराव आंग्रे यांनी या किल्ल्याची पायाभरणी केली आणि तो मराठा जलदळाचा एक प्रमुख तळ ठरला. 1818 मध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि काही काळ तो तुरुंग म्हणून वापरण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर हा किल्ला भारतीय नौदलाच्या ताब्यात गेला. आज हा किल्ला पर्यटनासाठी खुला असून, मराठा साम्राज्याच्या सागरी सामर्थ्याचे आणि कोकणातील ऐतिहासिक शौर्याचे जिवंत प्रतीक मानला जातो.